देशातील बॅंक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. तीन बड्या आणि आघाडीच्या खासगी बँका HDFC Bank, Axis Bank आणि Kotak Mahindra Bank यांच्या बॅंकमधून 7,700 हून अधिक कर्मचारी संख्या कमी झाली आहे. विशेष म्हणजे या तिन्ही बॅंकांनी आर्थिक वर्ष 2025-26 (FY26) मध्ये अनेक कर्मचाऱ्यांची भरती केली, त्यांच्यासाठी शाखाही सुरु केल्या मात्र तरीही एकूण कर्मचारी संख्या कमी झाली आहे.
तिन्ही बँकांमधील एकूण कर्मचारी संख्या 3,93,028 वरून 3,85,300 इतकी झाली आहे. पूर्वी ज्या कामांसाठी मोठ्या मनुष्यबळाची गरज भासत होती, तीच कामे आता AI, ऑटोमेशन आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी वेळेत आणि कमी संसाधनांमध्ये पूर्ण होत आहेत. यावर बॅंकांनी असं म्हटलं की, तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे अनेक प्रक्रिया अधिक कार्यक्षम झाल्या आहेत.
त्यामुळे मनुष्यबळाची गरज पूर्वीपेक्षा वेगळ्या स्वरूपाची झाली आहे, आणि त्यामुळे ही घट झाली आहे. त्यामुळे हे स्पष्ट होते की, या तिन्ही बॅंकांमध्ये झालेली मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात ही AI मुळे करण्यात आलेली नाही. बँका अजूनही मोठ्या प्रमाणावर भरती करत आहेत. मात्र आता त्यांना कर्मचाऱ्यामध्ये योग्य कौशल्य असणे महत्त्वाचे वाटते आहे.
म्हणजेच भविष्यात बँकिंग क्षेत्रात रोजगाराच्या संधी कायम राहतील, पण कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित कौशल्यांना प्राधान्य देण्याची गरज असणार आहे. आगामी काळात बँकिंग क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर AI, डेटा अॅनालिटिक्स, क्लाउड, सायबर सिक्युरिटी आणि डिजिटल तंत्रज्ञानाशी संबंधित कौशल्ये आत्मसात करणे अत्यावश्यक ठरणार आहे. बँकिंगचे भविष्य आता केवळ शाखांमध्ये नाही तर तंत्रज्ञानाच्या बळावर उभ्या राहणाऱ्या स्मार्ट सेवांमध्ये आकार घेत आहे.