रात्रभर पडत असलेल्या पावसाचा हार्बर रेल्वेवर परिणाम झाल्याचे पाहायचा मिळत आहे. नवी मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलकडे येणाऱ्या लोकलसेवा ठप्प झाल्या आहेत. पनवेलमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे हार्बर रेल्वेवरील सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. पनवेलहून सीएसएमटीला जाणारी 4.57 ची लोकल अर्ध्यातासापासून वाशी स्थानकावर थांबून राहिल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या इतर लोकलही खोळंबल्या आहेत.
पनवेल आणि बेलापूरहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. अशातच नेरुळ-वाशीदरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे पनवेलहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल सेवा सध्या पूर्णपणे ठप्प झाली आहे. गाड्या वेळेवर सुटत नसल्यामुळे वाशी, नेरुळ, बेलापूर आणि पनवेल स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. ओव्हर हेड वायर दुरुस्त केली असून सेवा पूर्ववत झाल्याची मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी माहिती दिली आहे.
मात्र स्थानकावर अजूनही रेल्वे सेवा ठप्प असल्याच्या सूचना देत आहेत. दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून स्थानकांमध्ये पुढील येणाऱ्या सूचना दिल्या जात आहेत. तर दुसरीकडे सेंट्रल मार्गावर आज वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू असून कल्याण ते सीएसएमटी स्लो आणि फास्ट मार्गावर वाहतूक थोडी उशिराने सुरू आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर वाहतूक वेळापत्रकानुसार सुरू आहे. दरम्यान हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.