Halwa Ceremony Before Union Budget: बजेटच्या आधी का होते ‘हलवा सेरेमनी’? गोड पदार्थामागे लपलेली मोठी परंपरा; जाणून घ्या

केंद्रीय बजेट सादर होण्यापूर्वी दरवर्षी पार पडणारी हलवा सेरेमनी ही बजेटच्या अंतिम टप्प्याची सुरुवात मानली जाते.

Halwa Ceremony Before Union Budget: बजेटच्या आधी का होते ‘हलवा सेरेमनी’? गोड पदार्थामागे लपलेली मोठी परंपरा; जाणून घ्या

Halwa Ceremony Before Union Budget: देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होण्याआधी दरवर्षी दिल्लीत एक अनोखी आणि तितकीच महत्त्वाची परंपरा पार पडते, ती म्हणजे ‘हलवा सेरेमनी’. ही केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून, बजेट तयार करण्याच्या अंतिम टप्प्याची सुरुवात मानली जाते. याच समारंभातून अर्थसंकल्पाशी संबंधित अत्यंत गोपनीय प्रक्रिया सुरू होते.

यंदाही १ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या केंद्रीय बजेटपूर्वी २७ जानेवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पारंपरिक हलवा सेरेमनीमध्ये सहभाग घेतला. हा कार्यक्रम दिल्लीत रायसीना हिल्स परिसरातील नॉर्थ ब्लॉकमध्ये आयोजित करण्यात आला. नॉर्थ ब्लॉक हे वित्त मंत्रालयाचं मुख्यालय असून, बजेटसंदर्भातील सर्व महत्त्वाची कामं इथेच पार पडतात.

भारतीय संस्कृतीत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गोड पदार्थाने करण्याची परंपरा आहे. त्याच परंपरेचा भाग म्हणून बजेटच्या अंतिम टप्प्याची सुरुवात हलवा बनवून केली जाते. अर्थमंत्री स्वतः कढईला स्पर्श करून आणि उपस्थित अधिकाऱ्यांना हलवा वाटून या प्रक्रियेला औपचारिक मंजुरी देतात.

हलवा सेरेमनीमध्ये प्रत्यक्षात मोठ्या कढईत हलवा तयार केला जातो. साधारणपणे हा हलवा गहू किंवा सूजीपासून बनवला जातो, ज्यामध्ये भरपूर देसी तूप आणि सुकामेवा वापरला जातो. दरवर्षी या समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ समोर येतात आणि नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण करतात.

या समारंभानंतर सुरू होतो ‘लॉक-इन पीरियड’. बजेट तयार करणारे अधिकारी आणि कर्मचारी पूर्णपणे बाहेरील जगापासून वेगळे केले जातात. बजेट सादर होईपर्यंत ते नॉर्थ ब्लॉकच्या बेसमेंटमध्येच राहतात. या काळात त्यांना घरच्यांशी किंवा बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधण्यास मनाई असते. मोबाईल फोन, इंटरनेट आणि इतर संप्रेषण साधनांवर कडक निर्बंध लावले जातात.

ही व्यवस्था का केली जाते, यामागे एक महत्त्वाचं कारण आहे, गोपनीयता. १९५० च्या दशकात एकदा बजेट लीक झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर केंद्र सरकारने बजेट प्रक्रियेला पूर्णपणे सुरक्षित आणि गुप्त ठेवण्यासाठी लॉक-इन आणि हलवा सेरेमनीची परंपरा सुरू केली. आज बजेट प्रक्रिया जरी डिजिटल झाली असली, तरी माहिती बाहेर जाऊ नये यासाठी ही परंपरा अजूनही तितक्याच काटेकोरपणे पाळली जाते.

अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर देशाच्या आर्थिक दिशेचा आरसा आहे. त्या महत्त्वाच्या दस्तऐवजाची सुरुवात गोड पदार्थाने आणि शिस्तबद्ध गोपनीयतेने होणे, ही भारतीय प्रशासनाची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख मानली जाते. त्यामुळे दरवर्षी बजेटपूर्वी होणारी हलवा सेरेमनी ही केवळ विधी न राहता, आर्थिक शिस्त आणि परंपरेचं प्रतीक ठरते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number