Haldiram’s Viral Video: हल्दीरामवर पुन्हा प्रश्नचिन्ह; शेवपुरीत जिवंत अळी सापडल्याने खवय्ये संतप्त, व्हिडिओ व्हायरल

मालाडमधील इन्फिनिटी मॉलमधील हल्दीराम आउटलेटमध्ये शेवपुरीत जिवंत अळी आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Haldiram’s Viral Video: हल्दीरामवर पुन्हा प्रश्नचिन्ह; शेवपुरीत जिवंत अळी सापडल्याने खवय्ये संतप्त, व्हिडिओ व्हायरल

मुंबई: मालाड पश्चिम येथील इन्फिनिटी मॉलमधील प्रसिद्ध हल्दीराम आउटलेटमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. 17 एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेत एका ग्राहकाने घेतलेल्या शेवपुरीमध्ये चक्क जिवंत अळी आढळल्याने खवय्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकारामुळे अन्नसुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ग्राहकाने हल्दीरामच्या आउटलेटमधून शेवपुरी खरेदी केली होती. मात्र, खाण्याच्या वेळी त्यात हालचाल करणारी अळी दिसल्याने तो चकित झाला. या घटनेनंतर ग्राहकाने तात्काळ दुकानातील कर्मचाऱ्यांकडे तक्रार नोंदवली. मात्र, या गंभीर प्रकाराची दखल घेण्याऐवजी कर्मचाऱ्यांनी नवीन शेवपुरी देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्राहकाने केला आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी संबंधित ब्रँडच्या अन्नाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. ‘क्वालिटी’ आणि ‘हायजीन’चा दावा करणाऱ्या मोठ्या ब्रँडमध्ये असा प्रकार घडल्याने ग्राहकांचा विश्वास डळमळीत झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, याआधीही हल्दीरामच्या उत्पादनांमध्ये अशुद्धता आढळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कोल्हापूरमध्ये एका ग्राहकाने विकत घेतलेल्या पॅकबंद मिठाईत मृत मच्छर आढळल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे या ब्रँडच्या अन्न सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन (FDA), फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI), महापालिकेचा आरोग्य विभाग तसेच स्थानिक पोलीस प्रशासन यांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी अशा प्रकारांवर कठोर कारवाई करून ग्राहकांच्या आरोग्याची सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number