Sakharecha Haar Recipe: गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी प्रत्येक घराच्या दारात गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात केले जाते. गुढी सजवताना कडुनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या, झेंडूचे फुल आणि साखरेच्या गाठी यांना विशेष महत्त्व असते. विशेषतः साखरेच्या गाठी या गुढीपाडव्याच्या पूजेत अनिवार्य मानल्या जातात.
सध्या बाजारात विविध रंगांच्या आणि डिझाइनच्या साखरेच्या गाठी सहज उपलब्ध असतात. मात्र अनेक वेळा त्या महाग असतात किंवा शेवटच्या क्षणी मिळत नाहीत. अशा वेळी घरच्या घरी अगदी कमी वेळात आणि कमी खर्चात साखरेच्या गाठी तयार करता येतात. ही पारंपरिक पद्धत सोपी असून कोणतीही व्यक्ती सहज करून पाहू शकते.
घरगुती साखरेच्या गाठी बनवण्यासाठी लागणारे साहित्यही अगदी मोजके असते. साखर, पाणी, थोडे दूध आणि इनो यांचा वापर करून आपण परफेक्ट गाठी तयार करू शकतो. सर्वप्रथम एका भांड्यात साखर आणि पाणी एकत्र करून ते मंद आचेवर उकळवून घ्यावे. थोड्याच वेळात साखरेचा पाक तयार होतो. हा पाक योग्य घट्टपणाचा झाला की त्यात थोडे तूप घालून चांगले मिसळावे.
यानंतर तयार केलेला पाक गाठीच्या साच्यात किंवा अप्पे पॅनमध्ये टाकून सेट होण्यासाठी ठेवावा. आधीच त्या साच्याला हलके तेल लावून ग्रीस करून घ्यावे, जेणेकरून गाठी सहज निघतील. काही वेळाने हा मिश्रण थंड होऊन घट्ट होते आणि सुंदर, पांढऱ्या शुभ्र साखरेच्या गाठी तयार होतात. या गाठींमध्ये धागा घालून आपण गुढीसाठी हारही तयार करू शकतो.
या पद्धतीची खासियत म्हणजे आपण आपल्या आवडीनुसार गाठींना वेगवेगळे आकार आणि रंग देऊ शकतो. घरगुती गाठी स्वच्छ, शुद्ध आणि चविष्टही असतात. त्यामुळे पूजेसाठी त्यांचा वापर अधिक समाधानकारक ठरतो.
गुढीपाडव्याच्या दिवशी या गाठी गुढीला बांधून त्याची पूजा केली जाते. तसेच कडुनिंबाच्या पानांसह गाठी खाण्याची परंपराही आहे. यामागे आरोग्यदायी आणि सांस्कृतिक महत्त्व दडलेले आहे.
ही सोपी रेसिपी सोशल मीडियावरही लोकप्रिय होत असून अनेक जण घरच्या घरी साखरेच्या गाठी तयार करत आहेत. हा व्हिडीओ ‘शाम्भवी किचन’ने पोस्ट केला आहे. गुढीपाडव्याच्या तयारीत घरच्या घरी बनवलेल्या साखरेच्या गाठींमुळे सणाचा आनंद दुप्पट होऊ शकतो.