वृत्तसंस्था, नवी दिल्ली
वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी काऊन्सिलची गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत हॅण्डीक्राफ्टच्या 29 वस्तूंवरील पूर्णपणे कर माफ करण्यात आले आहेत. याशिवाय जवळजवळ 49 इतर वस्तूंवरील कर कमी करण्यात आला आहे.
येत्या 25 जानेवारीपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.
जुन्या वाहनांच्या विक्रीमध्ये डिलर मार्जिनवरील जीएसटी 28 टक्क्यावरुन 18 टक्के करण्यात आला आहे. सेवांचा विचार केल्यास सूचना अधिकारच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवांना जीएसटी नाही.
शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी सिंचनासंबंधीच्या काही उपकरणं आणि यंत्रांवरील जीएसटी आधी 18 टक्के होता तो आता 12 टक्के करण्यात आला आहे. कोनमधील मेंहदी आणि चिंच चूर्णावरील जीएसटी आधी 18 टक्के होता तो आता 5 टक्के करण्यात आला आहे.
20 लीटर पाण्याच्या बाटलीवरील जीएसटी 18 टक्क्यावरुन 12 टक्के करण्यात आलं आहे. बायो डिझेल आणि वेगवेगळ्या सेंद्रीय खतांवरील जीएसटी 18 टक्क्यावरुन 12 टक्के करण्यात आला आहे. हिरे आणि बहुमूल्य धातूंवरील जीएसटी आधी 3 टक्के होता आता 0.25 टक्के करण्यात आला आहे.
श्रवणयंत्रावर मात्र आता जीएसटी आकारला जाणार नाही. टेलरिंगवरील जीएसटी आधी 18 टक्के होता तो 5 टक्के करण्यात आला आहे. थीम पार्क, वॉटर पार्क, जॉय राइट, मेरी गो राऊंड, गो कार्टिंग यासावरील जीएसटी आधी 28 टक्के होता तो 18 टक्के करण्यात आला आहे.
रुग्णवाहिकेवर 15 टक्के दराने लावलेला सेस हटवला आहे. सार्वजनिक वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या बायो गॅसवरील जीएसटी आधी 28 टक्के होता आता 18 टक्के करण्यात आला आहे.