वृत्तसंस्था, मुंबई
फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. फेक बातम्यांचा वाढता आलेख पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय. पहिल्यांदा फेक न्यूज दिल्यास सहा महिन्यांसाठी मान्यता रद्द करण्यात येणार, तर दुसऱ्यांदा नियम मोडल्यास एका वर्षासाठी मान्यता रद्द करण्यात येणार, तर तिसऱ्यांदा नियमाचं उल्लंघन केल्यानंतर पत्रकाराची कायमस्वरुपी मान्यताच रद्द करण्यात येणार आहे.
माहिती आणि प्रसारण विभागातील मार्गदर्शक तत्त्वांमध्येही तसा बदल करण्यात आलाय. मात्र ‘फेक न्यूज’ची नेमकी व्याख्या अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. प्रिंट मीडियातील फेक न्यूजबाबत पीसीआय, तर टीव्हीवरील फेक न्यूजबाबत एनबीएकडे तक्रार करण्यात येईल. मात्र, डिजिटल मीडियाबाबत यामध्ये कोणत्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाही. याच संबंधित चर्चेसाठी मंगळवार संध्याकाळी चार वाजता ‘प्रेस क्लब ऑफ इंडिया’ येथे पत्रकारांची तात्काळ बैठक बोलावण्यात आली.