मुंबई, १७ मे २०२३, प्रतिनिधी : मराठी सिनेमे आणि चित्रपटगृह यांचा वाद गेल्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. या प्रकरणावर अखेर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मराठी चित्रपट प्रेमींना दिलासा मिळालाय.
मराठी सिनेमांना चित्रपटगृहे मिळण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारच्या निर्णयानुसार आता महाराष्ट्रातील प्रत्येक चित्रपटगृह चालकाला वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवणं बंधनकारक असणार आहे. जर चित्रपटगृह चालकाने या नियमांचे पालन केले नाही तर त्यांना १० लाखांचा दंड ठोठवण्यात येईल अशी घोषणा सांस्कृतिक कामकाज मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
सांस्कृतिक कामकाज मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट द्वारे ही घोषणा केली. आपल्या ट्विट मध्ये ते म्हणाले,” “मराठी चित्रपटांना सिनेमागृह तथा प्राईम टाईम उपलब्ध करुन देणेबाबत आज मंत्रालयात बैठक पार पडली. एखाद्या चित्रपटगृह धारकानं मराठी चित्रपट जर वर्षातून चार आठवडे न दाखवल्यास त्याला परवाना नूतनीकरणाच्यावेळी 10 लाख रुपये दंड आकारण्यात येईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तर सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमध्ये भाडे वाढवू नये , असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.