मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलातील धक्कादायक घटना समोर आली. नेस्कोकडून 11 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या 2 विद्यार्थ्यांचा ड्रग ओव्हरडोसने मृत्यू झाला. या प्रकरणी वनराई पोलिसांनी एफआयआर दाखल करून पाच आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणात आणखी एक अपडेट समोर आली आहे. गोरेगाव ड्रग्स पार्टीमध्ये सहभागी असलेल्या 6 आरोपींना वनराई पोलिसांनी काल बोरिवली न्यायालयात हजर केले. जिथे त्यांना 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव सनी जैन, बालकृष्ण कुरूप,रौनक खंडेवाल,आनंद पटेल, प्रतीक पांडे, आकाश समल आहेत.
हेही वाचा- Drugs Overdose : लाईव्ह कॉन्सर्टला ड्रग्जचा विळखा; भर कार्यक्रमात दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील गोरेगावमध्ये आयोजित एका हाय-प्रोफाईल लाईव्ह कॉन्सर्ट पार्टीमध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 11 एप्रिल रोजी एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टच्या आयोजनामध्ये मोठ्या संख्येने तरुण-तरुणी सहभागी झाले होते. या कॉन्सर्टला आलेल्या विद्यार्थ्यांनी ड्रग्ज घेतलं होतं आणि ड्रग्जचा ओव्हर डोस घेतल्यामुळे त्यांची प्रकृती खालवली असा संशय व्यक्त केला गेला. या प्रकरणी वनराई पोलिसांनी एफआयआर दाखल करून पाच आरोपींना अटक केले होते. ज्यामध्ये विद्यार्थ्यांसोबत पार्टीच्या आयोजकाचाही समावेश आहे.
ड्रग ओव्हरडोसने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू
गोरेगाव नेस्कोकडून आयोजित करण्यात आलेल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या जमुनालाल कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. नेस्को संकुलात आयोजित कार्यक्रमाला तब्बल 3 ते 4 हजारांची गर्दी उपस्थित होती. यावेळी ड्रग ओव्हरडोस घेतल्यामुळे दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आणखी एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या या प्रकरणात मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी मृत विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. ही घटना परवा संध्याकाळी घडल्याची माहिती समोर आली असून वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कॉलेज वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.