रायपूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्सचे समोरील टायर अचानक फुटल्याने अनियंत्रित झालेली बस रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन एका मोठ्या झाडावर जोरात आदळली. गोंदिया जिल्ह्यातील मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील मुरदोली गावाजवळ ही घटना घडली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे, तर इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. प्रवाशांनी गच्च भरलेली खासगी ट्रॅव्हल्स 40 प्रवाशांना घेऊन रायपूरकडून सोलापूरच्या दिशेने जात होती.
मुरदोली गावाजवळ महामार्गावर अचानक बसचा समोरील टायर मोठ्या आवाजासह फुटले. टायर फुटल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट डिव्हायडर व दुसऱ्या बाजूचा रस्ता ओलांडून झाडावर जाऊन धडकली. झाडाला झालेली धडक इतकी भीषण होती की बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात अर्शद राशिद अहमद (भिलाई) हा तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे.