नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय सराफा बाजारातील कमकुवत कामगिरीमुळे मंगळवारी भारतातील सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दराने तर आज थेट ‘गटांगळी’ खाल्ली असून प्रति किलोमागे तब्बल 5 हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर सोन्याचे दरही 700 रुपयांनी घसरले आहेत. ऐन लग्नसराईच्या आणि सणासुदीच्या काळात झालेल्या या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे बाजारात खरेदीदारांची गर्दी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज झालेल्या कपातीनंतर प्रति तोळा सोन्याचा मूळ भाव 1,56,000 रुपयांवर आला आहे. मात्र, यावर 3 टक्के जीएसटी (GST) लागू झाल्यानंतर ग्राहकांना प्रत्यक्ष खरेदीसाठी 1,60,680 रुपये मोजावे लागत आहेत. व्यावसायिक आणि तज्ज्ञांच्या मते, सकाळी 11.30 वाजेपर्यंत बाजारात आणखी काही प्रमाणात घसरण होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली होती, ज्यामुळे बाजारात काहीसा संभ्रम आणि उत्सुकता दोन्ही पाहायला मिळाली.
गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी आज चांदीच्या दरातील घसरण सर्वाधिक लक्षवेधी ठरली आहे. एकाच दिवसात 5,000 रुपयांची कपात झाल्यामुळे आज चांदीचा प्रति किलोचा दर 2,68,000 रुपयांवर स्थिरावला आहे. जीएसटीसह (3 टक्के GST) हा दर 2,76,400 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरात झालेली ही मोठी घसरण गुंतवणूकदारांसाठी खरेदीची उत्तम संधी मानली जात आहे