नवी दिल्ली: युद्धाचे ढग आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर आलेली मळभ या अस्वस्थ वातावरणात, गुंतवणूकदारांसाठी 'सुरक्षित' मानल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीने पुन्हा एकदा त्यांची झळाळी दाखवून दिली आहे. मध्यपूर्वेत धुमसत असलेल्या इराण-इस्रायल संघर्षामुळे एकीकडे जगभरातील पुरवठा साखळी आणि विशेषतः एलपीजी गॅसची गणिते बिघडली आहेत. व्यावसायिक गॅस पुरवठ्यावरील निर्बंधांमुळे औद्योगिक क्षेत्र आधीच चिंतेत असताना, आता सराफा बाजारात मात्र अभूतपूर्व तेजीची लाट उसळली आहे. 'आगीत तेल' ओतणाऱ्या या युद्धजन्य परिस्थितीत अचानक आलेल्या एका शांततेच्या झुळकीने पिवळ्या आणि पांढऱ्या धातूंना अक्षरशः गगनभरारी दिली आहे.
पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक व्यापाराला मोठा फटका बसत आहे. साधारणतः अशा अनिश्चिततेच्या आणि युद्धजन्य परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या महिनाभरात या परंपरेला छेद देणारी उलट परिस्थिती बाजारात पाहायला मिळाली होती. गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने बाजारात काहीशी संभ्रमावस्था होती. पण आता मागील अवघ्या 48 तासांत सराफा बाजाराने कात टाकली असून सोने आणि चांदीचे दर सुसाट वेगाने नवे उच्चांक प्रस्थापित करत आहेत.
या अचानक आलेल्या तेजीमागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एक महत्त्वपूर्ण विधान कारणीभूत ठरले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविरामाबाबत अत्यंत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे संकेत ट्रम्प यांनी नुकतेच दिले आहेत. या एका आश्वासक विधानाने जागतिक राजकारणात आणि अर्थकारणात आशेचा किरण निर्माण केला. परिणामी, जागतिक शेअर बाजारासह कमोडिटी आणि सराफा बाजारातही गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास दुणावला आणि खरेदीचा मोठा ओघ पुन्हा सुरू झाला आहे.
आज बुधवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरांनी ऐतिहासिक उसळी घेतली. अवघ्या एका दिवसात 10 ग्रॅम (एक तोळा) सोन्याच्या दरात तब्बल 3,760 रुपयांची भक्कम वाढ नोंदवली गेली. आकडेवारीनुसार, 24 मार्च रोजी 1,42,810 रुपयांवर असलेले 24 कॅरेट सोने बुधवारी (25 मार्च) थेट 1,46,670 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले. यासोबतच 22 कॅरेट सोन्याचा दर 1,34,450 रुपये, तर 18 कॅरेट सोन्याचा दर 1,10,010 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. ज्यांनी 10 तोळे (100 ग्रॅम) सोने घेतले होते, त्यांच्या संपत्तीत एका झटक्यात 37,600 रुपयांची वाढ झाली आहे.
सोन्यासोबतच सध्या बाजारात चांदीचीही मोठी 'चांदी' झाली आहे. बुधवारी सोन्याच्या पावलावर पाऊल ठेवत चांदीनेही दरवाढीचे सर्व विक्रम मोडीत काढले. एका किलो चांदीच्या दरात तब्बल 15,000 रुपयांची महाकाय उसळी पाहायला मिळाली, ज्यामुळे चांदीचा दर थेट 2,50,000 रुपये प्रति किलोच्या ऐतिहासिक टप्प्यावर जाऊन पोहोचला आहे. प्रति ग्रॅम चांदीमागे 250 रुपयांची वाढ झाल्याने औद्योगिक आणि किरकोळ गुंतवणूकदारांचे डोळे विस्फारले आहेत.
एकंदरीतच, आंतरराष्ट्रीय राजकारणातील घडामोडी आणि ट्रम्प प्रशासनाच्या नव्या मवाळ भूमिकेमुळे बुलियन मार्केटमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. युद्धविरामाची चर्चा प्रत्यक्षात आल्यास अर्थव्यवस्थेला आणि जागतिक व्यापाराला स्थैर्य मिळेल, या आशेवर गुंतवणूकदार मोठी खरेदी करत आहेत. येत्या काळात इराण आणि अमेरिकेची राजनैतिक समीकरणे कोणते वळण घेतात, यावरच सराफा बाजाराची पुढील दिशा अवलंबून असली तरी सध्यातरी सोने-चांदीने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची उंची गाठली आहे, हे नक्की.