मुंबई: जागतिक पातळीवरील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतात सोन्याच्या दरात मागील काही दिवसांत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 15027 रुपये इतका नोंदवला गेला आहे. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 13774 रुपये असून 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 11270 रुपये इतका आहे. काल प्रति ग्रॅम दर 15028 रुपये होता, जो आज 15027 रुपयांवर आला आहे.
मध्यपूर्वेत वाढत असलेल्या तणावामुळे जागतिक बाजारात सोने-चांदीच्या किमतीत मोठी चढउतार सुरू आहेत. इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे आर्थिक अनिश्चितता वाढली आहे. अशा परिस्थितीत अनेक गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत. त्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ होत असून त्याचा परिणाम किमतींवरही दिसून येत आहे.
आर्थिक अस्थिरता, महागाईची भीती आणि चलनातील चढउतार या कारणांमुळे पारंपरिकरित्या मौल्यवान धातूंना सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. तज्ज्ञांच्या मते, जागतिक संघर्ष किंवा आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता अधिक असते. अनेक शतकांपासून संपत्तीचे संरक्षण करणारा विश्वासार्ह पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जाते.
भारताच्या प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर जवळपास समान पातळीवर आहेत. मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, केरळ आणि पुणे येथे 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 15027 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 13774 रुपये आणि 18 कॅरेटचा दर 11270 रुपये इतका आहे. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 15042 रुपये , तर चेन्नईमध्ये तो 15163 रुपये इतका नोंदवला गेला आहे. अहमदाबाद आणि वडोदरा येथे 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 15032 रुपये प्रति ग्रॅम आहे.
दरम्यान, चांदीच्या किमतीतही काहीशी घसरण दिसून आली आहे. चांदीचा दर प्रति किलोग्रॅम सुमारे 264900 रूपयांपर्यंत खाली आला आहे. मागील चार दिवसांमध्ये चांदीच्या किमतीत 10 हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. बाजारातील चढउतार असूनही चैत्र नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हे दर काही प्रमाणात दिलासादायक मानले जात आहेत.
विशेष म्हणजे, काल गुढीपाडव्याच्या निमित्तानेही सोने-चांदीच्या दरात काहीशी घट दिसून आली होती. सणासुदीच्या काळात दागिने खरेदीची परंपरा असल्यामुळे बाजारात मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत जागतिक परिस्थिती आणि गुंतवणूकदारांच्या हालचालींचा सोने-चांदीच्या दरांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.