Gold-Silver Price Today: गेल्या काही दिवसांपासून विक्रमी उंचीवर पोहोचलेल्या सोने आणि चांदीच्या दरांमध्ये आता मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या दिवशी मौल्यवान धातूंच्या किमतींवर विक्रीचा दबाव कायम राहिल्याने सराफा बाजारातील वातावरण पूर्णपणे बदलले आहे. लग्नसराईच्या हंगामात वाढलेल्या दरांमुळे चिंतेत असलेल्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी गुंतवणूकदार मात्र सावध झाले आहेत.
शुक्रवारी, 15 मे रोजी MCX वर सोन्याच्या दरात तब्बल 1500 रुपयांची घसरण झाली. त्याचवेळी चांदीच्या किमतीत मोठी पडझड होत तब्बल 9 हजार रुपयांची घट नोंदवण्यात आली. त्यामुळे काही दिवसांपूर्वी तीन लाखांच्या दिशेने झेपावणाऱ्या चांदीच्या भावाला मोठा ब्रेक लागल्याचे दिसून आले.
देशांतर्गत फ्युचर्स बाजारात जून महिन्याच्या सोन्याच्या वायद्याचा भाव 0.87 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1,60,562 रुपयांवर पोहोचला. दुसरीकडे, जुलै महिन्याच्या चांदीच्या वायद्याचा दर 3.28 टक्क्यांनी घसरत 2,81,551 रुपये प्रति किलोवर आला. या घसरणीमुळे सराफा बाजारात खरेदीदारांची पुन्हा हालचाल वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम भारतीय बाजारावर दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने अमेरिकन डॉलर मजबूत झाला आहे. त्याचबरोबर अमेरिकन ट्रेझरी यील्ड्समध्येही वाढ होत असल्याने सोन्यासारख्या non-yielding (उत्पन्न न देणारे) मालमत्तांवर दबाव वाढला आहे.
याशिवाय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील संभाव्य चर्चेकडेही जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण असल्याने गुंतवणूकदार मोठे व्यवहार टाळत असल्याचे दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरांमध्ये आठवडाभरातील नीचांकी पातळी नोंदवली गेली आहे. ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या किमतींमुळे महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली असून प्रमुख मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवण्याच्या भूमिकेत असल्याने सोन्यावरचा दबाव आणखी वाढू शकतो, असे आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी नागरिकांना अनावश्यक सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर केंद्र सरकारने आयात शुल्कात वाढ केली होती. मात्र आता बाजारातील घसरणीमुळे पुढील काही दिवसांत सोन्या-चांदीच्या किमती कोणत्या दिशेने जातात, याकडे ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघांचेही लक्ष लागले आहे.