पुणे : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक येथे हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आज, गुरुवारी दुपारी छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची अँजिओग्राफी केली. त्यानंतर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया हृदयरोग तज्ज्ञ डॉ. समिन शर्मा यांनी यशस्वीरित्या पार पाडली. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या प्रमोद सावंत यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती लवकरच दिली जाणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.