नवी दिल्ली: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता जगभरातील अर्थव्यवस्थेवर उमटू लागले आहेत. या संघर्षाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर होत असून त्याचा परिणाम सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरापासून ते वाहनांच्या खर्चावरही दिसू लागला आहे. सोमवार, आज 16 मार्च 2026 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जागतिक तेलपुरवठा साखळीवर परिणाम झाला असून इंधनाच्या किमतींवर दबाव वाढत आहे.
सोमवारी सकाळी बाजार उघडताच कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सुमारे दोन टक्क्यांची वाढ दिसून आली. ब्रेंट क्रूडची किंमत 2.01 डॉलरने वाढून 105.15 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली. तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड 1.61 डॉलरने वाढून 100.32 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. विशेष म्हणजे या महिन्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 40 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून 2022 नंतरचा हा सर्वाधिक स्तर मानला जात आहे.
जागतिक बाजारातील या वाढीचा परिणाम भारतातील इंधन दरांवरही दिसू लागला आहे. 16 मार्च रोजी काही राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली असली तरी दिल्ली आणि मुंबईसारख्या प्रमुख महानगरांमध्ये दर जवळपास स्थिर राहिले आहेत.
दिल्लीत पेट्रोलचा दर 94.77 रुपये प्रति लिटर असून उत्तर प्रदेशमध्ये तो 94.46 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 103.54 रुपये प्रति लिटर तर डिझेल 90.03 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. कोलकात्यात पेट्रोल 105.45 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.02 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 0.04 रुपयांनी कमी होऊन 100.80 रुपये प्रति लिटरवर आले असून डिझेलचा दर 92.39 रुपये प्रति लिटर आहे.
दरम्यान, काही राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. गुजरातमध्ये पेट्रोल 0.73 रुपयांनी वाढून 95.27 रुपये प्रति लिटर झाले आहे. उत्तराखंडमध्ये 0.90 रुपयांनी वाढ होऊन दर 93.64 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. गोव्यात पेट्रोल 0.64 रुपयांनी वाढून 96.96 रुपये प्रति लिटर झाले आहे. आंध्र प्रदेशमध्ये दर 0.53 रुपयांनी वाढून 109.57 रुपये प्रति लिटर झाला आहे. महाराष्ट्रात पेट्रोल 0.42 रुपयांनी वाढून 104.64 रुपये प्रति लिटर झाले आहे, तर पश्चिम बंगालमध्ये 0.42 रुपयांनी वाढ होऊन दर 106.64 रुपये प्रति लिटर झाला आहे. मात्र उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्ये आज इंधन दरांमध्ये कोणताही बदल नोंदवण्यात आलेला नाही.
तज्ज्ञांच्या मते, इराणने होर्मुज सामुद्रधुनीतील वाहतूक बंद केल्यामुळे जागतिक तेलपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या मार्गातून जगातील सुमारे 20 टक्के तेल वाहतूक केली जाते. तसेच इराणच्या खार्ग बेटावरील प्रमुख तेल निर्यात केंद्रावर हल्ल्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे गुंतवणूकदारांमध्येही चिंता वाढली आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने या परिस्थितीला जागतिक तेल बाजारातील सर्वात मोठ्या पुरवठा संकटांपैकी एक असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने मोठा निर्णय घेतला आहे. एजन्सीने आपल्या सुरक्षित साठ्यातून सुमारे 400 दशलक्ष बॅरल तेल बाजारात सोडण्याची घोषणा केली आहे. आशिया आणि ओशिनिया देशांमधील साठे तात्काळ उपलब्ध करून दिले जाणार असून युरोप आणि अमेरिकेतील साठे मार्चच्या अखेरीस बाजारात आणले जाणार आहेत. या निर्णयामुळे जागतिक बाजारात काही प्रमाणात स्थैर्य येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.