मुंबई, ८ मे २०२३, प्रतिनिधी : बारामतीमध्ये भरदिवसा एका तरुणीला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. ही घटना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या ‘सहयोग सोसायटी’ निवासस्थान परिसरामध्ये शनिवार घडली होती. याप्रकरणी बारामती पोलीस स्टेशनमध्ये आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, बारामती दौऱ्यात असलेल्या अजित पवारांनी याप्रकरणाचा उल्लेख करत कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही, असं म्हणत टुकार कारट्यांना थेट निर्वाणीचा इशारा दिला आहे.
चुकीचे वागणाऱ्या कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला. येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी परिसरात एका युवतीचा विनयभंग करत मारहाणीची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर पवार म्हणाले, मी यासंबंधी अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आहे. त्या प्रकरणात तरुणावर गुन्हा दाखल झाला असून मी माझ्या पद्धतीने पोलिसांना बोललो आहे.
पालकांनो, बारामतीकरांनो आपल्या मुलांना, मुलींना ते कुठे जाताहेत, कोणाशी बोलताहेत, त्यांचे मित्र – मैत्रिणी कोण आहेत, याकडे लक्ष ठेवा, असे आवाहन पवार यांनी केले. ही आईवडिलांची ही जबाबदारी आहे. कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. तर आम्ही लोकप्रतिनिधी, पोलीस विभाग लक्ष द्यायला तयार आहोत. कोणाचाही मुलाहीजा ठेवणार नाही, अशी ग्वाही देतो, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांचं निवासस्थान असलेल्या बारामतीतील ‘सहयोग सोसायटी’च्या प्रवेशद्वाराजवळ एका तरुणीला मारहाण झाली. संबंधित तरुणी सहयोग सोसायटी येथे मेहंदी काढण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी अरफाज सादिक आत्तार याने तरुणीचा विनयभंग करुन तिला मारहाण केली. यामध्ये ती तरुणी जखमी झाली आहे. तसेच या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.