Ganesh Festival: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची रेल्वे तिकिटांसाठी झुंबड! अनेक गाड्या फुल, ‘रिग्रेट’चा संदेश पाहून प्रवाशांची चिंता वाढली

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वे तिकिटांसाठी मोठी गर्दी झाली आहे. कोकणकन्या, मंगळुरू एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले असून अनेक ठिकाणी 'रिग्रेट'चा संदेश दिसत आहे.

Ganesh Festival: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची रेल्वे तिकिटांसाठी झुंबड! अनेक गाड्या फुल, ‘रिग्रेट’चा संदेश पाहून प्रवाशांची चिंता वाढली

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची तयारी सुरू होताच रेल्वे तिकिटांसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यंदा १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी होणार असल्याने मुंबई आणि उपनगरांतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी आतापासूनच आरक्षणासाठी धाव घेतली आहे. परिणामी, कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्यांमधील आरक्षित जागा वेगाने भरत असून काही गाड्यांमध्ये प्रतीक्षा यादीची मर्यादाही ओलांडली आहे.

रेल्वेच्या नियमानुसार प्रवासाच्या ६० दिवस आधी तिकीट आरक्षण सुरू होते. त्यानुसार १० जुलैपासून ८ सप्टेंबरच्या प्रवासासाठी तिकिटांचे बुकिंग सुरू झाले आहे. आरक्षण सुरू होताच मोठ्या संख्येने प्रवाशांनी तिकीट बुक केल्याने अनेक गाड्यांमध्ये वेटिंग लिस्ट झपाट्याने वाढली. काही गाड्यांमध्ये तर प्रतीक्षा यादी पूर्ण झाल्यामुळे आरक्षण करताना 'रिग्रेट'चा संदेश दिसू लागला आहे.

विशेषतः मुंबई-गोवा मार्गावरील कोकणकन्या एक्स्प्रेस, मंगळुरू एक्स्प्रेस तसेच कोकणातून धावणाऱ्या इतर प्रमुख रेल्वेगाड्यांमध्ये आरक्षित तिकीट मिळणे कठीण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने रेल्वे सेवांवर मोठा ताण निर्माण झाला आहे.

हेही वाचा: Hingoli Earthquake: हिंगोली जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाने हादरला; औंढा नागनाथ तालुक्यातील 'या' ठिकाणी केंद्रबिंदूची नोंद

तिकीट मिळवण्यासाठी प्रवासी रेल्वे आरक्षण केंद्रांवर पहाटेपासूनच रांगा लावत आहेत. याशिवाय आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर, मोबाईल अॅपवर तसेच खासगी ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर तिकीट बुकिंग सुरू आहे. आरक्षण सुरू होताच काही मिनिटांतच जागा संपत असल्याने अनेक प्रवाशांची निराशा होत आहे.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालवाव्यात, अशी मागणी कोकणवासीयांकडून केली जात आहे. दरवर्षी गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जात असल्याने यंदाही अतिरिक्त फेऱ्यांची घोषणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Chandrashekhar Bawankule: 2034 च्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी केली मोठी भविष्यवाणी; म्हणाले, '14 कोटी जनतेची भावना…'

तिकीट आरक्षणासाठी अद्याप प्रयत्न सुरू असले तरी अनेक प्रवाशांना निश्चित जागा मिळेल की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. त्यामुळे विशेष गाड्यांची घोषणा कधी होणार, याकडे कोकणात जाणाऱ्या हजारो गणेशभक्तांचे लक्ष लागले आहे. गणेशोत्सवासाठी गावाकडे जाण्याचा बेत आखणाऱ्यांनी शक्य तितक्या लवकर आरक्षण करण्याचा सल्लाही जाणकारांकडून दिला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number