छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत शिगेला पोहोचली आहे. नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. शहरात दर महिन्याला सुमारे चारशे ते साडेचारशे म्हणजेच रोज सरासरी 13 नागरिकांना भटके कुत्रे चावत आहेत. मात्र, दुसरीकडे मनपाकडून दिवसाला फक्त आठ कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जाते. कुत्र्यांच्या हल्ल्यात मोंढा येथील एका चिमुकल्याच तर कसाब खेडा येथील एका चिमुकल्याचा बळी गेला आहे. तर दोन बालके गंभीर जखमी झाले आहेत. असे असतानाही तीस लाखांचे बिल थकल्याने मनपातील कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम पाहणाऱ्या प्रमुख एजन्सीने सहा महिन्यापूर्वीच काम थांबवले आहे. प्रशासनाच्या या कारभारामुळे शहराची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे दिसून येत आहे.
शहरातील मोंढा नाका येथील बालकाचा श्वानदंशाने मृत्यू झाल्यानंतर कसाबखेडा येथे 22 जुलै रोजी दुसरी घटना घडली. एका पाच वर्षाचा चिमुकल्याचा भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेच्या धक्केतून सावरत नाही. तोच गेल्या पंधरा दिवसात सातारा – देवळाई परिसरात कुत्र्यांचा हल्ल्यात आणखी दोन चिमुकले गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये एका चिमुकलीचा कान फाटला आहे. शासकीय आकडेवारीनुसार 2025 – 26 या वर्षात पाच हजार जणांना कुत्रे चावल्याची नोंद असून खासगी रुग्णालयात किंवा घाटीत गेलेल्या रुग्णांची यात नोंद नसल्याचेही समोर येत आहे.