उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारी करणाऱ्यां तीन तरुणांनी टाकलेल्या जाळ्यात तब्बल ४२ किलो वजनाचा कटला जातीचा मासा सापडला आहे.
नितीन काळे, सुदाम चव्हाण व अक्षय चव्हाण या मच्छिमारांच्या जाळ्यात हा मासा सापडला.
त्यांनी आज हा इंदापूर तालुक्यातील इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण येथील उपबाजारात विक्री करण्यास आणला होता. लिलावात त्याची विक्री करण्यात आली. १३० रुपये किलो या दराने काही वेळातच हा मासा ५४६० रुपयांनी विकला गेला.
तब्बल ४१.५० किलोचा मासा आढळ्याने उजनी धरण क्षेत्रातील आजपर्यंत आढळलेला हा सर्वात मोठा मासा असल्याचं मच्छीमारांनी सांगितलं. यापूर्वी साधारण वीस ते तीस किलो वजनापर्यंतचे मासे या जलाशयात आढळून आले आहेत. मात्र मंगळवारी अचानकपणे मासेमारी करणाऱ्या तरुणांच्या जाळ्यात हा मासा सापडला. मोठा मासा विक्रीस आल्याने आल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनीही या ठिकाणी भेट देऊन या माशासंदर्भात माहिती घेतली.
उजनी धरण पाणलोट क्षेत्र हे मासेमारी करण्यासाठी सर्वात मोठे क्षेत्र आहे. हजारो मच्छीमार या ठिकाणी मासेमारी करुन आपली उपजीविका करतात. सध्या उजनी धरण शंभर टक्के भरले असून मासे मोठ्याप्रमाणावर मिळत असल्याने इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील मासेमारीत सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे