अहमदनगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी काही दिवसांपूर्वी आपण तांबेंचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे त्यांच्यावर पक्षातूनच टीका झाली होती. यानंतर बुधवारी बाळासाहेब साळुंखे यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
पदवीधर मतदारसंघातील राजकीय घडामोडींनतर जिल्हाध्यक्ष साळुंखे यांनी तांबे यांना पाठिंबा देण्यासंबंधीचे मत स्थानिक वृत्तपत्रांतून व्यक्त केले होते. त्या बातमीच्या आधारे प्रदेश कार्यालयाने साळुंखे यांना नोटीस पाठवून दोन दिवसांत खुलासा करण्यास सांगितले होते. मात्र, साळुंखे यांनी खुलासा तर केला नाहीच, उलट आपला राजीनामा पाठवून दिला आहे. त्यामुळे ते आता तांबे यांच्या प्रचारात सक्रीय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काँग्रेसने तांबे यांच्यावर अन्याय केला असून त्याचा निषेध म्हणून आपण राजीनामा देत असल्याचे बाळासाहेब साळुंखे यांनी यावेळी म्हटलं आहे. तर नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्या पार्श्वभूमीवरच आता साळुंखे यांनी राजीनामा दिल्यामुळे ते आता पुढे काय भूमीका घेणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
आता राजीनाम्यासंबंधी बोलताना ते म्हणाले, “कित्येक वर्षे निष्ठापूर्वक काम करणाऱ्या तांबे कुटुंबीयांवर काँग्रेसने अन्याय केला आहे, अशी आमची भावना आहे. अशा परिस्थितीत तांबे यांच्या पाठिशी राहणे आवश्यक आहे. त्यामुळे मी तशी भूमिका व्यक्त केली होती. मात्र, पक्षांतर करून आलेल्या अनेकांची पक्षात चलती आहे. कोणाच्या तरी सांगण्यावरून, पूर्ण माहिती न घेता, परिस्थितीचे आकलन न करता निष्ठावन मंडळींवर बाहेरून आलेले कारवाई करीत असतील तर ते चुकीचे आहे. त्यामुळे याचा निषेध करीत मी प्रदेशाध्यक्षांकडे पोस्टाने राजीनामा पाठविला आहे,” असे साळुंखे यांनी सांगितले.