आधी मुंबई पुणे एक्सप्रेस वे मुळे प्रवास सुसाट झाला होता. त्यात मुंबई पुण्यातील अंतर कमी करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेला मिसिंग लिंक गेमचेंजर ठरला आहे. हा मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर आज बुधवारी 17 जून रोजी सकाळी पहिला अपघात झाला आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तिन गाड्या एकमेकांवर आदळून एक विचित्र अपघात झाला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाट येथील मिसिंग लिंकच्या पुणे लेनवरील केबल-स्टेड ब्रिजवर तीन वाहनांचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या फॉर्च्युनर कार चालकाने अचानक ब्रेक दाबून तिसऱ्या लेनमध्ये गाडी थांबवली.
यामुळे मागून येणाऱ्या एका व्हेर्ना कारने फॉर्च्युनरला धडक दिली. व्हेर्नाच्या मागे असलेल्या दुसऱ्या कारनेही पुढच्या वाहनाला धडक दिली, ज्यामुळे तीन वाहनांचा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच, महामार्ग पोलीस, एम.एस.आर.डी.सी. कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही, परंतु तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकच्या पुणे लेनवर सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती. यानंतर, क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हलवण्यात आली आणि वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.