कथित १९ बंगल्याप्रकरणी उद्धव गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उद्धव यांच्या रायगड जिल्ह्यातील कोर्लईतील कथित १९ बंगल्याप्रकरणी पहिली अटक करण्यात आली आहे. कोर्लई गावचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक करण्यात आली आहे.,
फेब्रुवारीमध्ये उद्धव यांच्या कथित १९ बंगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी, ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायती अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. यामध्ये सरकारी रेकॉर्डमध्ये खाडाखोड करून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. तर, तपास यंत्रणांनी गावचे सरपंच आणि संबंधित लोकांच्या कागदपत्रांची तपासणी केली होती. दरम्यान, याप्रकरणी आता कोर्लई गावचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक करण्यात आली आहे.
भाजपा नेते किरीट सोमैया यांनी उद्धव यांच्या कथित १९ बंगल्याप्रकरणी आरोप केला होता. सोमैयांनी याप्रकरणाचे धागेदोरे उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांशी जोडले असल्याचा दावा केला होता. त्यानुसार, याप्रकरणी ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तीन ग्रामसेवक, कोर्लई गावचे माजी चार सरपंच, अशा सात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या सात आरोपींपैकी कोर्लईचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक केली आहे. तर, उर्वरीत लोकांची पोलीस चौकशी करत आहेत. त्यामुळे आता उद्धव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.