पालघर येथे जयपूर एक्सप्रेक्षमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी पहाटे ५ च्या सुमारास घडली. या घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर काही प्रवासी जखमी झाले आहेत. हल्लेखोर घटनेनंतर फरार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी राजस्थान येथून जयपूर एक्सप्रेस निघाली होती. या गाडीने आज सकाळी गुजरात सोडून महाराष्ट्रात प्रवेश केला. दरम्यान, आज सकाळी, पहाटे ५ वाजता ही गाडी पालघर जवळ येताच अज्ञात हल्ले खोरांनी काही प्रवाशांवर गाडीत अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत चार प्रवासी हे जागी ठार झाले. तर काही प्रवासी हे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार झाल्याची माहिती जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आहे. हल्लेखोर गोळीबार केल्यानंतर फरार झाले आहे. पोलिसांनी तातडीने याची दखल घेत हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथकांची स्थापना केली आहे. गोळीबारानंतर ही गाडी काही काळ पालघर येथे थांबवण्यात आली होती. त्यानंतर ही गाडी मुंबई सेंट्रल या ठिकाणी आणण्यात आली आहे.
आज पहाटे झालेल्या या घटनेमुळे राज्य हादरले आहे. धावत्या गाडीत प्रवासी सुरक्षित नसल्याचे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हल्लेखोरांनी गोळीबार का केला, हे अद्याप समजू शकलेले नाही. हा हल्ला दरोड्याच्या हेतूने केला होता का याची देखील माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, हल्लेखोर फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, या हल्ल्यात जखमी तसेच मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची नावे समजू शकली नाही.