Palghar Fire: पालघर जिल्ह्यातील डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असलेल्या एका शासकीय आश्रमशाळेच्या वसतिगृहात आज दुपारी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. धुराचे लोट आणि विद्यार्थ्यांच्या किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरून गेला होता. सुदैवाने, प्रसंगावधान राखल्यामुळे वसतिगृहातील 200 पेक्षा अधिक विद्यार्थी सुरक्षित बाहेर पडले आणि एक मोठी जीवितहानी टळली.
नेमकी घटना काय?
दुपारच्या सुमारास वसतिगृहाच्या इमारतीतून अचानक धूर येऊ लागला आणि काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. ज्यावेळी आग लागली, तेव्हा वसतिगृहात 200 हून अधिक मुले होती. आगीची भीषणता पाहून विद्यार्थ्यांमध्ये एकच घबराट पसरली आणि सर्वांनी जिवाच्या आकांताने इमारतीबाहेर धाव घेतली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
साहित्याचे प्रचंड नुकसान
विद्यार्थ्यांचे प्राण वाचले असले तरी, आगीत त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांचे कपडे, अंथरुण-पांघरूण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर्षभराचे शैक्षणिक साहित्य जळून खाक झाले आहे. आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अग्निशमन दलाची गाडी येण्यापूर्वीच स्थानिकांनी पाण्याच्या साहाय्याने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.
हेही वाचा – Slab Collapse In Navi Mumbai : नवी मुंबईत मोठी दुर्घटना; खासगी क्लासचा स्लॅब कोसळला, पाच विद्यार्थी जखमी
विद्युत ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर
सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून कुलिंग ऑपरेशन पूर्ण झाले आहे. मात्र, या घटनेमुळे आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळांमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शाळांमधील विद्युत यंत्रणेचे फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट वेळेवर होते का? असा संतप्त सवाल पालक आणि नागरिकांकडून विचारला जात आहे.