जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईत पुन्हा एकदा मोठी आग लागण्याची घटना घडली आहे. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर रविवारी पहाटे चारच्या सुमारास भंगार गोदमांना आग लागली. अग्निशमन दलाच्या 16 गाड्या आणि टँकर्स आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.
या गोदमांमध्ये प्लायवूड, कपड्याच्या चिंध्या, प्लास्टिक आणि ऑईल असे सामान भरले होते. सुरुवातीला एका गोदमाला लागलेली आणि नंतर ही आग पसरत गेली आणि तब्बल 10 ते 12 गोदामांना या आगीने आपल्या कचाट्यात घेतले.
आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. सातत्याने पाण्याचे फवारे आगीवर मारण्यात येत आहेत, मात्र आग ही वाढतच जात आहे. जवळपासच्या हवेत सर्वत्र धुराचा लोट उसळलेला दिसत आहे. झोपडपट्टीपर्यंत आग पोहचू नये म्हणून अग्निशमन दल शर्तीचे प्रयत्न करत आहे.

आग पहाटेच्या सुमारास लागल्यामुळे काही जण आगीत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुदैवाने अद्यापही जीवितहानी झाल्याचं कोणतंही वृत्त हाती आलेलं नाही. तरीही अग्निशमन दलाकडून मानखुर्द लिंक रोडवरील आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.