उन्हाच्या झळांनी रान तापले असताना, अचानक राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. शेतात डोळ्यादेखत कुजणारे पीक, अशा भीषण कात्रीत शेतकरी सापडला असून,निसर्गाच्या या लहरीपणाने पुन्हा एकदा ग्रामीण महाराष्ट्राचे आर्थिक कंबरडे मोडून काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात सतत पाऊस कोसळताना दिसत आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खास देखील हिरावला. या परिस्थितीमुळे बळीराजाचे डोळे पाणावले असून शेतकरी हतबल झाला. शेतकऱ्यांना या पिकातून मोठे उत्पन्न मिळणार होते मात्र कापणीला आलेले पीकच उध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तत्काळ नुकसान भरपाई चे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली होती. बळीराजाच्या या मागणीला सरकारकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.
राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी मदत जाहीर झाली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 दरम्यान अवकाळीमुळे झालेल्या नुकसानासाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. महसूल विभागाकडून मदतीसाठी पहिल्या टप्प्यात 53 कोटी 83 लाख रुपयांचे वितरण जाहीर करण्यात आले आहे.
याअंतर्गत नागपूर, अमरावती, पुणे व संभाजीनगर विभागांना मदत मिळणार असून संबंधित चार विभागांमधील 66 हजार 312 शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. यावेळी एकूण 49 हजार 511 हेक्टर बाधित शेती क्षेत्रासाठी नुकसान भरपाई मिळणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी द्वारे थेट आर्थिक मदत मिळणार आहे.