मुंबई, ३० मे २०२३ , प्रतिनिधी : आपापल्या कारकिर्दीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनावर चित्रपट बनवण्याचे सत्र केल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. अशातच अनेक क्रिकेटपटूंच्या जीवनावर देखील चित्रपट बनले आहेत आणि ते सुपरहिट देखील झालेत. लवकरच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार अलिडकडेच निर्माता लव रंजन आणि अंकुर गर्ग सौरव गांगुलीची भेट घेतली. यावेळी चित्रपटाच्या पटकथेवर बातचीत करण्यात आली. या चित्रपटाच्या माध्यमांतून सौरव बद्दल अनेक रंजक गोष्टी तसेच त्याच्या आयुष्याशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे या चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका कोण साकारणार ? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरीही अभिनेता रणबीर कपूर किंवा अभिनेता आयुष्मान खुराना या अभिनेत्यांची नावे बरीच चर्चेत आहेत. आता या चित्रपटाची अधिकृत घोषणा कधी होणार याकडे सगळ्यांच्या नजर आहेत.