छत्रपती संभाजीनगर : अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदी तुकाराम मुंडे आल्यापासून राज्यात सर्वत्र कारवाईचा धडाका सुरु आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात भेसळ करणाऱ्यांविरोधात धडक मोहिम सुरु असून, याअंतर्गत 1 जून ते 9 जूनपर्यंतच्या अवघ्या नऊ दिवसांत 27 ठिकाणी धाडी टाकून तब्बल दोन कोटी 47 लाख 75 हजार रुपयांचा प्रतिबंधित आणि संशयित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. गुटखा, सुगंधी तंबाखू तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात मोठी धडक मोहीम राबवली आहे.
मराठवाड्यात 1 जून ते 9 जून 2026 या कालावधीत एकूण 27 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या कारवाईदरम्यान प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू, एनर्जी ड्रिंक्स, खाद्यतेल, तूप, पनीर, मसाले, लस्सी आणि अन्य अन्नपदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे 2 कोटी 47 लाख 75 हजार रुपये इतकी आहे. या मोहिमेत एकूण 9 एफआयआर दाखल करण्यात आले असून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 6 आस्थापने सील करण्यात आल्या आहेत. कारवाईदरम्यान 8 वाहनेही जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत सुमारे 75 लाख 50 हजार रुपये इतकी आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, नांदेड, जालना, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांबरोबरच भेसळयुक्त तूप, खाद्यतेल, मसाले आणि इतर अन्नपदार्थांवरही प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अन्न व औषध प्रशासनाची ही मोहीम आगामी काळातही सुरू राहणार असल्याचे संकेत असून, भेसळ आणि प्रतिबंधित पदार्थांच्या व्यापाराविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीकांत करकले यांनी दिली.
FDA ची कारवाई थोडक्यात –
27 ठिकाणी मराठवाड्यात छापेमारी
2 कोटी 47 लाख 75 हजार रुपयांचा माल जप्त
9 एफआयआर दाखल
9 जणांना अटक
6 आस्थापना सील
8 वाहने जप्त
75 लाख 50 हजार रुपयांची वाहने जप्त