मंगळवेढ्याच्या सलगर बुद्रूकमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजातील खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रेमविवाह केलेल्या पोटच्या मुलीला आई-वडिलानी संपवले. अनुराधा विठ्ठल बिराजदार ही बीएएमएस शिक्षण घेत होती. मुलीने शेतातील सालगड्याच्या मुलांसोबत प्रेमविवाह केला. ही बाब तिच्या आई-वडिलांना पटली नाही.
अनुराधा ही कर्नाटकातील विजयपूर जिल्हयात सिंदगी येथे बीएएमएसच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. 1 तारखेला कर्नाटकात अनुराधा यांनी प्रेमविवाह केले. याची माहिती वडीलांना समजताच त्यांनी अनुराधाला सिंदगीमधून आणून बोराळे येथील तिच्या मामाकडे सोडले.
4 ऑक्टोबरला अनुराधाला तिच्या वडीलांनी तोंडी परीक्षा बाकी असल्याचे सांगून बोराळे गावातून सलगर बुद्रूकमध्ये आणले. त्याच रात्री वडील विठ्ठल बिरादार आणि आई श्रीदेवी यांनी अनुराधाला जीवे मारले आणि शेतात नेऊन तिच्यावर अत्यसंस्कार ही केले.
अनुराधाने मामाकडे असताना एक चिठ्ठी लिहली होती. त्या चिठ्ठीत तिने सावत्र आई आणि वडीलांची भीती वाटत असल्याचं लिहिलं होतं. आपल्या जीवाचं काही बरं-वाईट झाल्यास आई वडील जबाबदार असतील, असं तिने आधीच चिठ्ठीत लिहीलं होतं. अनुराधाने लिहिलेली चिठ्ठी हे एकमेव पुरावा आहे. यामुळेच अनुराधाला सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याने आई-वडिलांनीच मारल्याचे उघड झालं आहे.
अनुराधाचे मामा बाळासाहेब म्हमाणे यांच्या फिर्यादीवरून, अनुराधाचे वडील विठ्ठल बिराजदार, सावत्र आई श्रीदेवी बिराजदार यांना मंगळवेढा पोलिसांनी अटक केली आहे.