बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या भालेगाव बाजार येथे मध्यरात्री तीन वाजे दरम्यान एका दारुड्याने अंगणात झोपलेल्या तब्बल आठ जणांवर लाकडी दांड्याने जीवघेणा हल्ला केला आहे. यामध्ये आठ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या दारुड्याने दारूच्या नशेत कुणाचे डोके फोडले तर कुणाचा हात तोडला आहे. सर्व जखमींना आधी खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, यातील काहींना अकोला येथील जिल्हा रुग्णाला हलवण्यात आले आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूर मेडिकल कॉलेजला हलवण्यात आले आहे. मोठ्या हिमतीने गावातील नागरिकांनी या दारुड्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. गणेश दीवनाले असं या दारुड्याचं नाव आहे.