नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच आता बुलढाण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील मलकापूर शहरात दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर जोरदार धडक झाली असून त्यात सहा प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. याशिवाय २५ ते ३० प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरीक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची माहिती आहे. जखमींची संख्या जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मलकापूर येथील लक्ष्मी नगर उड्डान पुलावर ही घटना घडल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील लक्ष्मी नगर उड्डान पुलावर विरुद्ध दिशेने येत असलेल्या दोन ट्रॅव्हल्समध्ये जोरदार टक्कर झाली. मध्यरात्री झालेला हा अपघात इतका भीषण होता की त्यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. याशिवाय पुलावरून काही तरी मोठा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर स्थानिक पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. परंतु तोपर्यंत सहा प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झालेला होता. पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनांमधून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. अपघाताच्या घटनेत २५ ते ३० प्रवासी जखमी असून त्यातील काही लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
मलकापूर येथे झालेल्या अपघातानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध झाली नाही. त्यामुळं पोलिसांच्याच वाहनातून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ज्या प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना बुलढाण्यातील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी, ग्रामीण पोलीस निरीक्षक एफसी मिर्झा हे घटनास्थळी दाखल झाले आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून अपघाताचं कारण पोलिसांकडून शोधण्यात येत असल्याची माहिती आहे.