नाफेड चना खरेदीच्या नोंदणीला सोमवारी सुरुवात झाली होती. अमरावतीच्या धामणगाव रेल्वेतील नाफेड केंद्राबाहेर नोंदणी करिता शेतकऱ्यांनी गेल्या २४ तासापासून नोंदणी केंद्राबाहेर रांगा लावल्या. मात्र अचानक केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी झाल्याने तारांबळ उडाली. अखेर नोंदणी प्रक्रिया केंद्राला बंद करावी लागली. नोंदणीला २ मार्च पासून सुरुवात होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. इतकचं नाही तर, संपूर्ण रात्र शेतकऱ्यांनी रस्त्यावर काढली आहे. नाफेड केंद्राबाहेर शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली होती . नाफेडमध्ये शेतकऱ्यांना हमीभाव मिळतो. खाजगी बाजारात योग्य भाव मिळत नाही.
यावर्षी राज्यात एकूण २९ लाख २० हजार हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड करण्यात आली होती. यंदा हरभरा पिकासाठी वातावरण देखील चांगले असल्याने उत्पादनही चांगले निघत आहे. परंतु उत्पादित हरभरा विकायचा कुठे? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. कारण नाफेडच्या वतीने हरभरा हमीभावाने खरेदी केला जातो. परंतु या खरेदीची नोंदणीच अद्याप सुरु झाली नव्हती. त्यामुळे हरभऱ्याची खरेदी कधी सुरु होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात होता. परिणामी नाईलाजास्तव शेतकरी हरभरा मार्केटमध्ये विकत होते. बाजारात हरभऱ्याला कमी दर मिळत होता. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत होता. त्यामुळे नाफेडकडून हरभरा खरेदी सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार आजपासून अमरावती जिल्ह्यात हरभरा खरेदी नोंदणी सुरु झाली आहे.