राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मोठी घोषणा केल्यानंतर अनेक शेतकरी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. मात्र या कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी शासनाने एक महत्त्वाची अट घातली असून, ती म्हणजे डिजिटल नोंदणी. ‘अॅग्रीस्टॅक’ या प्रणालीमध्ये नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु अनेक शेतकरी अद्याप या प्रक्रियेपासून दूर असल्याचे समोर आले आहे.
शासन सध्या कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करण्याच्या दिशेने काम करत आहे. त्यासाठी ‘अॅग्रीस्टॅक’ या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती नोंदवली जात आहे. यात शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती, शेतीची तपशीलवार माहिती, कर्जाची स्थिती आणि इतर कागदपत्रांचा समावेश केला जात आहे. भविष्यातील सर्व कृषी योजना, अनुदान आणि कर्जमाफीसाठी हा डिजिटल डेटाबेस महत्त्वाचा ठरणार आहे.
हेही वाचा: Farmer Loan Waiver : मोठी बातमी! शेतकऱ्यांचे मध्यम मुदतीचे कर्ज माफ होणार? अपडेट समोर
सांगली जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात एकूण ७ लाखांहून अधिक शेतकरी आहेत. त्यापैकी सुमारे ६६ टक्के शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक प्रणालीमध्ये नोंदणी पूर्ण केली आहे. मात्र अद्याप लाखो शेतकरी या प्रक्रियेत सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे पुढील काळात कर्जमाफीचा लाभ मिळवताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध असणे आवश्यक आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने अॅग्रीस्टॅक अॅपमध्ये नोंदणी केली नसेल किंवा त्याची माहिती पूर्णपणे अपलोड झालेली नसेल, तर त्याचे नाव शासनाच्या डेटाबेसमध्ये नोंदले जाणार नाही. अशा परिस्थितीत पात्र असूनही काही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात.
नोंदणी प्रक्रियेदरम्यान काही शेतकऱ्यांना कागदपत्रांमधील त्रुटींमुळे अडचणी येत असल्याचेही समोर आले आहे. आधारकार्डमधील माहितीतील फरक, फार्मर आयडीमधील चुका किंवा आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे अनेक अर्ज अडकलेले आहेत. काही शेतकऱ्यांनी नोंदणी सुरू केली असली तरी अंतिम टप्प्यापर्यंत प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
कर्जमाफीसाठी आवश्यक माहिती संकलित करण्याचे काम जिल्ह्यातील सहकारी संस्था आणि बँकांच्या माध्यमातून सुरू आहे. सेवा सहकारी संस्था तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमार्फत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा तपशील गोळा केला जात आहे. ही माहिती शासनाच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड केली जात असून त्यानुसार पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.
प्रशासनाने शेतकऱ्यांना लवकरात लवकर अॅग्रीस्टॅक अॅपमध्ये नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी जवळच्या सेवा सहकारी संस्थेशी किंवा संबंधित बँकेशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे सांगण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, आधारकार्ड, फार्मर आयडी आणि इतर आवश्यक कागदपत्रे वेळेत जमा केल्यास नोंदणी प्रक्रिया जलद पूर्ण होऊ शकते. अन्यथा भविष्यातील कर्जमाफी योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.