राज्यात मागील काही दिवसांपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांनी महामोर्चा काढला होता. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक पाऊल उचलणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा महामोर्चा मागे घेत असल्याची घोषणा माजी आमदार जे.पी.गावित यांनी केली आहे.
जे.पी. गावित म्हणाले, राज्यसरकाने शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत निवदेन दिले. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून तात्काळ उपाययोजना केल्या जातील असेही सांगण्यात आले. अनेकदा मोर्चावेळी मागण्या मान्य केल्या जातात मात्र, नंतर मोर्चा मागे घेतल्यानंतर अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे राज्य सरकारने निवेदन दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कार्यवाही सुरू झाली असे लोकांचे फोन यायला हवेत, असे गावित म्हणाले. त्याप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शनिवारी योग्य कार्यवाहीला सुरूवात झाली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत कार्यवाहीला सुरूवात झाली आहे.. नाशिकमधील अनेक अधिकारी कामाला लागले आहेत. त्यामुळे शेतकरी महामोर्चा स्थगित करत असल्याची घोषणा जे.पी. गावित यांनी केली आहे. तसेच, सरकारकडून आमच्या मागण्या मान्य झाल्या असून त्याबाबत योग्य कार्यवाहीला सुरूवात झाल्यामुळे गावित यांनी सरकारचे आभार मानले आहेत.
शेतकरी महामोर्चाबाबत एक दु:खद बातमी समोर आली आहे. शेतकरी महामोर्चामधील एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शहापूरमध्ये उपचारादरम्यान या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पुंडलिक अंबादास जाधव असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. मोहाडी येथील दिंडोरी तालुत्यात वास्तव्यास होते. वासिंद येथे मुक्कामी असताना या शेतकरी आंदोलकास शुक्रवारी दुपारी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पुंडलिक यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.