प्रभात दुध कंपनी विविध अटी लादून दुध उत्पादक शेतकऱ्यांची लुट करत असून कंपनीने शेतकऱ्यांची ही लुट थांबवावी आणि शेतकऱ्यांचे थकीत देयक तातडीने द्यावे. या प्रमुख मागणीसाठी किसान सभा आणि दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे.
३१.०३.२०२१ ते ३०.०९.२०२२ या कालावधीचा २ रुपये प्रमाणे लाभांश द्या. इंडीफोस मशीनचे सेटिंग बदलता येत असल्याने सेटिंग बदलून शेतकऱ्यांची लुट होत असते. वजन व गुणवत्ता मापनामध्येही फेरफार करून लुट होते. ही लुट थांबविण्यासाठी पारदर्शक पद्धतीचा अवलंब करा. शेतकऱ्यांना कोठेही दुध घालता यावे यासाठी लाभांश, रिबीट, प्रोत्साहन अनुदान आदीसाठी ७० टक्के किंवा इतर अटी लादण्याची पद्धत त्वरित बंद करा. दुध उत्पादकाने बल्क कुलरवर स्वत: दुध घातले तर शेतकऱ्यांना वाहतूक अनुदान देण्याची पद्धत होती. शिवाय दुध संकलन केंद्राला मिळणारे कमिशनही दिवाळीच्या वेळी सभासद शेतकऱ्यांच्या मध्ये वाटप होत होते. आता बल्क कुलर बाहेर टपरी टाकून दुध संकलन केले जाते. टपरीवर दुध घातल्याने ते बल्क कुलरवर आणले नाही असे गृहीत धरून शेतकऱ्यांचे वाहतूक अनुदान व कमिशन मध्येच संपवून टाकले जाते. ही शेतकऱ्यांची लुट आहे. कंपनीने याबाबत विचार करून शेतकऱ्यांना वाहतूक अनुदान व कमिशन मिळेल अशी व्यवस्था करावी या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
राज्यातील सर्वच दुध उत्पादक तालुक्यांमध्ये अशा समस्यांबाबत संघटना राज्यव्यापी संघर्षाची हाक देणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. तहसीलदार श्री. थिटे, लॅक्टिलीसचे अधिकारी श्री. मराठे, श्री. मुंढे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत २० फेब्रुवारी पर्यंत याबाबतचे प्रश्न सोडविण्याचे मान्य करण्यात आले. २० फेब्रुवारी पर्यंत प्रश्न न सुटल्यास तहसील कार्यालय समोर बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला