राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची पहिली यादी आज सोमवारी (Loan Waiver)जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफी बद्दल माहिती दिली.
“उद्या कर्जमुक्तीची जी यादी येईल, ती यादी जाहीर झाल्यानंतर ती पूर्ण करून आम्ही पुढे जाणार आहोत. तसेच मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांमध्ये ही योजना पूर्ण होईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“जी घोषणा आम्ही आमच्या पहिल्या अधिवेशनात केली होती की, शेतकऱ्यांना ज्यांच पीक कर्ज २ लाखांपर्यंतचे आहे त्यांना आम्ही कर्जमुक्त करू त्याची पहिली यादी आम्ही उद्या जाहीर करतो याचा मला आनंद आहे.”
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबद्दल पहिली यादी उद्या जाहीर होईल. ही यादी सुरुवातीला मर्यादित स्वरूपात करतो.
दुसरी यादी २८ फेब्रुवारीला येईल. येत्या ३ महिन्यांचा कालावधी आम्ही म्हटलेला आहे पण येत्या एप्रिल शेवटपर्यंत ही योजना आम्ही पूर्ण करू, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री अनिल देशमुख देखील उपस्थित होते.
दरम्यान आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे.