मुंबई, १३ मे २०२३, प्रतिनिधी : हिंदी चित्रपटसृष्टीतील बऱ्याच गाण्यांना आपल्या आवाज देणारा गायक पापोनचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्याचे लाईव्ह शो पाहण्यासाठी चाहते नेहमी आतुर असतात. दरम्यान बॉलिवूडचा सुप्रसिद्ध पार्श्वगायक पापोन हा सध्या रुग्णालयात दाखल झाला आहे. रुग्णालयातील आपला फोटो पोस्ट करत त्याने आपली प्रकृती बिघडल्याचे सांगितले.
सुप्रसिद्ध गायक पापोन हा सध्या मुंबईतील कोकिला धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्याच्यावर सध्या उपचार घेत आहे. या दरम्यान त्याने आपल्या प्रकृतीची माहिती देत एक भावुक पोस्ट समाज माध्यमांवर सामायिक केली आहे. पापोनने सामायिक केलेल्या फोटोत पापोन रुग्णालयात खाटेवर झोपलेला दिसत आहे तर त्याचा १३ वर्षांचा मुलगा त्याच्या शेजारी बसलेला दिसत आहे.
आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये पापोनने लिहिले, ‘आम्ही अशा लढाया एकट्याने लढतो. मला हे सर्व सोशल मीडियावर दाखवायला आवडत नाही, पण काल रात्री जे घडले ते काही वेगळेच होते. मी रुग्णालयात होतो आणि माझ्या 13 वर्षांच्या मुलाने रात्रभर माझ्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे आणि मी माझ्या शुभचिंतक आणि मित्रांसोबत हे शेअर करू इच्छितो.’ पापोन ची ही पोस्ट पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी कंमेंट्समध्ये त्याच्या प्रकृतीची काळजी घेण्यास सांगितले.