सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील कोंडी परिसरात सोमवारी पहाटे भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत दीड वर्षांच्या चिमुकल्यासह दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पुण्यातून निघालेल्या कुटुंबावर अचानक काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील देहूरोड परिसरात राहणारे रवि खंडागळे यांचे कुटुंब कारने अक्कलकोटकडे निघाले होते. पहाटेच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील कोंडी गावाजवळ त्यांच्या कारने समोरून जाणाऱ्या धावत्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा समोरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.
या अपघातात सिंधू रवि खंडागळे (वय 42), नंदा भाऊराव हाताळकर (वय 45) आणि दीड वर्षांचा रुद्राक्ष मोरे यांचा जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
दरम्यान, रुद्राक्षचे वडील उमेश प्रकाश मोरे (वय 32) आणि आई साक्षी मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
अपघातानंतर काही काळ परिसरात वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघातग्रस्त वाहन बाजूला हटवले. या घटनेची नोंद सोलापूर सिव्हिल पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अपघात नेमका कशामुळे झाला याचा अधिक तपास सुरू आहे.
अक्कलकोट दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्घटनेमुळे पुणे आणि सोलापूर परिसरात शोककळा पसरली आहे. दीड वर्षाच्या निष्पाप चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.