पटना: बिहारमधील शेखपूरा जिल्ह्यात यूपीएससी परीक्षेत यश मिळाल्याचा खोटा दावा करून चर्चेत आलेला युवक अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. आरोपी रंजीत यादव याला सोमवारी पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर यूपीएससी परीक्षेत 440वी रँक मिळाल्याचा आणि आयपीएस अधिकारी झाल्याचा खोटा दावा केल्याचा आरोप आहे. त्याचे मोटिव्हेशनल भाषणाचे आणि यशाबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रंजीत यादव हा शेखपूरा जिल्ह्यातील महुली पोलीस ठाणे क्षेत्रातील चेवाडा प्रखंडातील फतेहपूर गावचा रहिवासी आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी निकालानंतर त्याने स्वतःला यशस्वी उमेदवार असल्याचे सांगत 440वी रँक मिळाल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर स्थानिक पातळीवर त्याचा सत्कारही करण्यात आला होता.
माजी आमदार विजय सम्राट, स्थानिक सरपंच सरफराज मुखिया आणि महुली पोलीस ठाण्याचे प्रभारी राम प्रवेश भारती यांनीही त्याचा सत्कार करून अभिनंदन केले होते. त्यानंतर त्याचे प्रेरणादायी भाषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि देशभरात ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.
दरम्यान, प्रकरण व्हायरल झाल्यानंतर काही लोकांनी यूपीएससीच्या अधिकृत निकालाची तपासणी केली. त्यावेळी रंजीत यादवचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे समोर आले आणि त्या रँकवर दुसऱ्याच उमेदवाराचे नाव असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली होती.
प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी रंजीत यादवविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. अखेर सततच्या छापेमारीनंतर पोलिसांनी त्याला शेखपूरा शहरातील कॉलेज परिसरातून अटक केली.
या प्रकरणाबाबत पोलिस अधिकारी डॉ. राकेश कुमार यांनी सांगितले की आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी केली जात असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.