16 एप्रिल रोजी खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये महाराष्ट्र भूषण सोहळा पार पडला. यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र या सोहळ्याला मोठे गालबोट लागले. पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने अनेक लोकांचा मृत्यू झाला. आता आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक पत्र समाज माध्यमांवर प्रसारित झाले आहे. मात्र हे पत्र बनावट असल्याचे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. असे कुठलेही पत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वतीने जारी करण्यात आले नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
समाजमाध्यमांवर हे पत्र वेगाने व्हायरल होण्यास सुरुवात झाल्यामुळे खळबळ उडाली होती. याबाबत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रवक्ते तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सचिव संदीप पाटील यांच्याकडे विचारणा केली असता हे पत्र बनावट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कोणीतरी खोडसाळपणा करून जाणीवूर्वक यापूर्वी आप्पासाहेबांनी काढलेल्या पत्राचा वापर करून त्यातील मूळ मजकूर काढून त्यात, फेरफार करून हे पत्र तयार केले असल्याचे नमूद केले आहे.
या खोट्या व्हायरल पत्रात राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. या पत्रात आपल्याला जबरदस्तीने पुरस्कार घ्यायला लावण्यात आल्याचे म्हटले आहे. पुढे म्हटले आहे की, माझ्या अनुयायांचा मतांसाठी वापर केला. माझ्या साधकांसाठी मंडप टाकला नाही. झालेल्या घटनेची पूर्ण जबाबदारी घेऊन मी श्री सेवकांची माफी मागतो. माझ्या सर्व श्री सेवकांना मी आवाहन करतो की यापुढे भाजप आणि शिंदे गटाला मतदान करू नका, असे बनावट पत्रात नमूद करण्यात आले होते.