भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांचे बुधवार रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातून अनेक नेत्यांनी शोकसंदेश दिले आहेत. सामान्य लोकांशी नाळ असलेलं उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेल्याची प्रतिक्रिया देत फडणवीसांनी गिरीश बापटांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं आज दुपारी दीर्घ आजारानं निधन झालं आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राजकीय नेत्यांनी गिरीश बापट यांच्या निधनामुळं शोक व्यक्त केला आहे.
त्यानंतर आता भाजपाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार गिरीश बापट यांच्या आठवणी जागवत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. गिरीश बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांनी आजारातही लढवय्यासारखी झुंज दिली. आजारी असतानाही त्यांनी मतदारसंघावर लक्ष ठेवलं. बापटांचं निधन झाल्यामुळं भाजपची मोठी अपरिमित हानी झाली असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुखात सहभागी असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.