मोरूच्या ‘मावशी’च्या पोस्टवरून फेसबुक वॉर!

दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्या चौकटीबाहेरचा विचार करण्याच्या वृत्तीचं अनेकदा कौतुक झालं आहे, तर कधी त्यावर टीकाही झाली आहे. मात्र यावेळी विजय चव्हाण यांच्या मृत्यूशी संबंधित लिहिलेल्या पोस्टमुळे मात्र नाट्यवर्तुळ ढवळून निघालं आहे. मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक तरुण कलाकारांनी तसंच दिवंगत विजय चव्हाण यांच्या चाहत्यांनी […]

मोरूच्या ‘मावशी’च्या पोस्टवरून फेसबुक वॉर!

दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्या चौकटीबाहेरचा विचार करण्याच्या वृत्तीचं अनेकदा कौतुक झालं आहे, तर कधी त्यावर टीकाही झाली आहे. मात्र यावेळी विजय चव्हाण यांच्या मृत्यूशी संबंधित लिहिलेल्या पोस्टमुळे मात्र नाट्यवर्तुळ ढवळून निघालं आहे.

मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक तरुण कलाकारांनी तसंच दिवंगत विजय चव्हाण यांच्या चाहत्यांनी श्रद्धांजलीपर पोस्ट सोशल मीडियावर लिहिल्या आहेत. विजय चव्हाण यांना कायम प्रेमाने विजू मामा म्हटलं जात असे. तसाच उल्लेख अनेकांनी त्यांच्या निधनानंतर केला आहे. तसंच त्यांच्यासारखा कलाकार निवर्तल्याने रंगभूमी पोरकी झाल्याची भावनाही चाहत्यांनी व्यक्त केली. मात्र दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांना मात्र या गोष्टी खटकल्या आहेत. मराठी रंगभूमीवरील प्रत्येक कलाकार हा मामा किंवा मावशी का असतो? तसंच दर आठवड्याला असे मामा किंवा मावशी निधन पावत असताना दर वेळीच रंगभूमी पोरकी का होत असते? असा सवालच सचिन कुंडलकर यांनी फेसबुकवरून विचारला आहे. पुढे जाऊन याच पोस्टमध्ये सध्या मामा किंवा मावशी म्हणून संबोधले जाणारे कलाकार निधन पावल्यावर सध्याचे उमेश कामत, सई ताम्हणकर, अमेय वाघ, पर्ण पेठे, स्पृहा जोशी यांसारखे कलाकार तुमचे मामा, मावशी, आत्या बनणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. मराठी रंगभूमीवरील प्रत्येकाशी नातं जोडणा-या प्रथेला नावं ठेवतानाच त्यांनी रंगभूमी पोरकी झाल्याचा सूर लावणं फारच रटाळ असल्याचं म्हटलं आहे.

 सचिन कुंडलकर यांच्या या पोस्टने चाहत्यांमध्ये नाराजी उमटली आहे. केवळ चाहत्यांमध्येच नव्हे, तर मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील कलाकारही कुंडलकर यांच्या पोस्टने नाराज झाले आहेत. कुंडलकर यांना जरी आपलं मत मांडायचं स्वातंत्र्यं असलं, तरी दिवंगत विजय चव्हाण यांच्या मृत्यूनंतर थोडं तारतम्य बाळगून त्यांनी पोस्ट लिहायला हवी होती, असं म्हटलं जात आहे. विजय चव्हाण यांच्या श्रीमंत दामोदरपंत या नाटकाचं दिग्दर्शन करणा-या आणि जत्रासारख्या आपल्या अनेक सिनेमांचं दिग्दर्शन करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी कुंडलकर यांच्या पोस्टचा समाचार घेताना मोठ्या कलाकारांना मामा किंवा काकाम्हणण्यामागे आमचे संस्कार असल्याचं म्हटलं आहे.

  तर रंगभूमी आणि आता सेक्रेड गेम्स या वेबसीरिजमुळे नॅशनल सेन्सेशन बनलेल्या जितेंद्र जोशीने लांबलचक पोस्ट लिहून सचिन कुंडलकर यांना चांगलीच चपराक दिली आहे. मोठ्या कलाकारांना काका, मामा, मावशी’, ‘आत्या म्हणण्यामागे संस्कार असतात, असं जितेंद्र जोशी यांनी कुंडलकरांना सुनावलं आहे. कलाकारच नव्हे, तर संतांच्या महाराष्ट्र भूमीत ज्ञानोबांना माऊली आणि मुक्ताबाईंना मुक्ताईम्हणण्यामागेही आपले संस्कारच असतात, अशी आठवण करून दिली आहे. घरकाम करणा-या बाईंनाही आपण आदराने मावशी म्हणतो, तर रिक्षा, टॅक्लीवाल्यांनाही हाक मारताना काका असा आपसूकच उल्लेख करतो, तो याच संस्कारांचा भाग असल्याचं जितेंद्रने म्हटलं आहे. व्यक्तिगत संबंध नसतानाही अनेक दिग्गज कलाकारांना लोक आणि चाहते आपलं मानतात, यामागे त्या कलाकारांचं कर्तृत्व कारणीभूत असतं, याची आठवण करून दिली आहे. मात्र याचवेळी जितेंद्र सचिन कुंडलकर यांच्या आपल्या मातीतील संस्कारांना हिणकस मानणा-या, परदेशी प्रथांची वारंवार उदाहरणं देणा-या आणि एका विशिष्ट चौकटीतील लोकांमध्ये आपलं विचारवंत असं बिरूद मिरवणा-या वृत्तीवर थेट हल्लाबोल केला आहे. तरी या पोस्टमध्ये अत्यंत संयतपणे दिलेला जबाब हा कौतुकास्पद आहे.

 मराठी रंगभूमी ही मराठी भाषकांसाठी नेहमीच आपुलकीचा विषय ठरलेली आहे. रंगभूमीवरील कलाकारांशी भावनीक जवळीकही मराठी चाहत्यांची नेहमीच पाहायला मिळते. विशेष म्हणजे मराठी कलाकारांमध्येही नाट्य परिषदेच्या निवडणुका वगळता फारसा वाद होताना दिसत नाही. याचं कारण सर्वांमध्ये असणारे कौटुंबिक आणि भावनिक संबंध… मात्र यावेळी विजय चव्हाण यांच्या मृत्यूनंतर केलेल्या वादग्रस्त पोस्टवरून केदार शिंदे, जितेंद्र जोशी यांसारख्या कलाकारांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. तसंच या पोस्ट्सना अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनीही प्रतिक्रिया देत आपली मतं मांडली आहेत.

मिलिंद शिंत्रे यांनीही कुंडलकर यांच्या पोस्टवर टीका करणारी पोस्ट लिहिली आहे.

 

आपलं मतस्वातंत्र्य आपल्या फेसबुक वॉलवर मांडण्याचं व्यक्तिस्वातंत्र्य जरी मान्य असलं, तरी एखाद्या दुःखद घटनेचा विधीनिषेध बाळगणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. अनेक लोक या गोष्टी विसरून वादग्रस्त पोस्ट्स लिहिण्याचं प्रमाण सध्या वाढलं आहे. कुंडलकर यांच्यासारख्या नामांकित दिग्दर्शकांनीही हा मार्ग चोखाळल्याबद्दल अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number