मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, शुक्रवारी कर्मचारी पवारांच्या निवासस्थानी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनातील हल्लेखोऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे तर, गेल्या पाच महिन्यांपासून मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून बसेलेल्या संपकारी कर्मचाऱ्यांना तेथून हटवण्यात आले आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर कर्मचारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकात ठाण मांडून बसले होते. मात्र, तेथूनही पोलिसांनी त्यांची हकालपट्टी केली.
शुक्रवारी संतप्त एसटी कर्मचारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी धडकले. यावेळी आक्रमक कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच या आंदोलनातील हल्लेखोऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. तसेच शुक्रवारी घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी संपकारी कर्मचाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शनिवारी पहाटे पोलिसांनी मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून बसलेल्या संपकारी कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यास सुरूवात केली. पोलिसांनी संपूर्ण आझाद मैदान पूर्णपणे रिकामे केले. मात्र, आझाद मैदानातून कर्मचाऱ्यांना बाहेर काढल्यानंतर एसटी आंदोलकांनी मुंबईच्या सीएसएमटी या स्थानकात ठाण मांडले. परंतु, तेथूनही पोलिसांनी संपकारी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली.
शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांच्या कारवायांना वेग आला आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकावर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच रेल्वे स्थानकावर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची तिकीट तपासणी सुरू आहे. यावेळी संपकारी कर्मचारी आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली. दरम्यान, पोलिसांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढले.