मुंबई, ७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : पाच कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडे यांना अटक करण्यात आली आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात शैलजा दराडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासात त्या दोषी आढळल्याने त्यांना निलंबित देखील करण्यात आले होते. अखेर त्यांना सोमवारी हडपसर पोलीसांनी अटक केली. दराडे यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पोपट सूर्यवंशी या शिक्षकाकडून त्यांच्या नात्यातील दोन महिला शिक्षकांना नोकरी लावण्याचे अमिष दाखवून प्रत्येकी १२ आणि १५ लाख रुपये घेतल्याचा शैलजा दराडेंवर आरोप आहे. शैलजा दराडे यांनी हे पैसै त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे याच्या मार्फत पुण्यातील हडपसर भागात घेतल्याच तक्रारदार पोपट सुर्यवंशी यांनी दिली होती. मात्र पैसै देऊन देखील सूर्यवंशी यांना नोकरी न मिळवल्याने पोपट सुर्यवंशी यांनी पेसै परत मागीतले, मात्र ते देण्यास शैलजा दराडे यांनी नकार दिला. त्यामुळे पोपट सूर्यवंशी यांनी थेट न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते.
तक्रारदार पोपट सुर्यवंशी आणि शैलजा दराडे यांच्यात मोबाईलवरून २०१९ मध्ये संभाषणाची एक ऑडिओ क्लीप देखील समोर आल होती. ज्यामधे शैलजा दराडे या फक्त शिक्षण विभागातच नाही तर आर टी ओ मधे जर कोणाला नोकरी हवी असेल तर आपण ती लाऊन देऊ शकतो असं सांगत असल्याचे पुढे आले आहे. त्यासाठी पन्नास लाख रुपये त्यांनी मागितले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची सखोल तपासणी केल्यावर या प्रकारात शैलजा दराडे या दोषी आढळल्या. यामुळे त्यांना अटक करण्यात आली.
शैलजा दराडेंच्या आधी शिक्षण परिषदेचे अध्यक्ष असलेले तुकाराम सुपे यांनाही टी ई टी घोटाळ्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर शिक्षण परिषदेचा कारभार शैलजा दराडेंकडे सोपवण्यात आला होता. मात्र शिक्षकांना नोकरी लावण्याच्या बहाण्याने दराडे यांनी लाखो रुपये प्रत्येकाकडून जमा केले होते. ही रक्कम पाच कोटींच्या घरात होती.