सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अनेक व्हिडिओ अशा असतात ज्याच्या मागची कारण शोधण्यासाठी नेटकरी उत्सुक असतात. असाच एक चीनच्या गुइझोऊ प्रांतातील संपूर्ण पर्वतरांगांचा व्हिडिओ समोर आला आहे. चीनच्या गुइझोऊ प्रांतातील पर्वतरांग पुर्णपणे सौर पॅनेलने झाकलेल्या पाहायला मिळत आहेत.
पण एवढे सौर पॅनेल लावण्यामागचं कारण काय? तर वीजेची गरज पाहता अनेक देशांमध्ये सौरऊर्जा म्हणजेच सोलार एनर्जीचा वापर करण्यास सुरुवात केली गेली आहे. याच्या मदतीने नैसर्गिकरित्या सूर्याच्या किरणांद्वारे इलेक्ट्रीसिटी तयार केली जाते. वीज निर्मितीसाठी सौर पॅनेलचा वापर अनेक फायदे मिळवून देतो आणि यापासून प्रेरित होऊन आता चीनने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
अलिकडच्या वर्षांत देशाने नूतनीकरणक्षम उर्जेकडे लक्ष दिले आहे आणि आता जागतिक सौर ऊर्जा आणि पॅनेल उत्पादनावर जवळजवळ मक्तेदारी आहे. चीनच्या हेबेई प्रांतात बसवलेल्या या सौर पॅनल्सच्या मदतीने तयार होणाऱ्या इलेक्ट्रीसिटीला चीनची राजधानी बीजिंग येथे पाठवले जाणार आहे. यावर्षीच्या हिवाळी ऑलिंपिकसाठी सौर आणि पवन ऊर्जेचा वापर करण्याची चीनची योजना आहे.
येथे मोठ्या प्रमाणात सौर पॅनल्स बसवण्यात आले आहेत आणि याचे व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हे सोलार पॅनल्स चीनच्या हेबेई प्रांतातील ताईयांग पर्वतरांगांमध्ये लावण्यात आले आहेत. या सौर फार्म्समुळे दरवर्षी 2,50,000 मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन कमी होण्याची अपेक्षा आहे.