Chhatrapati Sambhajinagar: धक्कादायक! इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये पोह्यात आळी, भातात झुरळ; प्रशासनाचा मोठा दणका

छत्रपती संभाजीनगरातील पी.ई.एस. इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये पोह्यात आळी आणि भातात झुरळ आढळल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने परवाना तात्काळ निलंबित केला.

Chhatrapati Sambhajinagar: धक्कादायक! इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये पोह्यात आळी, भातात झुरळ; प्रशासनाचा मोठा दणका

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये अन्नाच्या गुणवत्तेबाबत धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीची कारवाई करत संबंधित कॅन्टीनचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित केला आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर झालेल्या तपासणीत अनेक गंभीर अनियमितता उघड झाल्याने ही कारवाई करण्यात आली.

ही घटना पी.ई.एस. इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहातील कॅन्टीनशी संबंधित आहे. काही दिवसांपासून विद्यार्थी कॅन्टीनमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत नाराजी व्यक्त करत होते. अखेर काही विद्यार्थ्यांनी पोहेमध्ये आळी आणि भातामध्ये झुरळ आढळल्याचा व्हिडिओ तयार करून तो अन्न व औषध प्रशासनाकडे पाठवला. या तक्रारीची गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांनी तातडीने तपासणी मोहीम राबवली.

हेही वाचा: Buldhana: शाळेत स्वच्छतागृहाचा अभाव ठरला जीवघेणा? नैसर्गिक विधीसाठी बाहेर गेलेल्या पाचवीच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे आणि कीर्तिका झाडे यांच्या पथकाने कॅन्टीनची पाहणी केली. तपासणीदरम्यान अनेक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाले. कॅन्टीनमध्ये वापरासाठी ठेवलेले मसाले, इडली रवा आणि इतर काही अन्नपदार्थ मुदतबाह्य असल्याचे आढळले. हा संपूर्ण साठा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तात्काळ नष्ट करण्यात आला.

याशिवाय, काही खाद्यपदार्थांमध्ये परवानगीशिवाय खाद्यरंगाचा वापर होत असल्याचेही निदर्शनास आले. कॅन्टीनमधील स्वच्छतेची परिस्थितीही अत्यंत खराब असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. अन्न साठवण्याच्या पद्धती, स्वयंपाकघरातील स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन यामध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली.

या सर्व बाबींचा विचार करून अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत संबंधित कॅन्टीनचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

हेही वाचा:Bhiwandi: मध्यरात्री भिवंडीत भीषण अग्नितांडव! रस्त्याच्या कडेला उभी असलेली खासगी बस जळून खाक, मोठी जीवितहानी…

ही संपूर्ण कारवाई सहायक आयुक्त (अन्न) दयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शैक्षणिक संस्थांमधील कॅन्टीनमध्ये अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छता याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे.

अन्न व औषध प्रशासनाने नागरिक आणि विद्यार्थ्यांना निकृष्ट, अस्वच्छ किंवा संशयास्पद अन्नपदार्थ आढळल्यास तत्काळ तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे. अशा तक्रारींवर त्वरित कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number