लोणावळा: महाराष्ट्राची कुलदैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील आई एकवीरा देवी देवस्थान सध्या एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भक्ती आणि शक्तीचा वारसा लाभलेल्या या पवित्र तीर्थक्षेत्राच्या गाभाऱ्यातच 'आर्थिक गैरव्यवहाराचा' आरोप झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या अफरातफरीसह देवीच्या दागिन्यांवर 'डल्ला' मारल्याचे गंभीर आरोप करण्यात आले असून, या प्रकरणी आता पोलीस आणि धर्मदाय आयुक्तांच्या दरबारी धाव घेण्यात आली आहे.
या प्रकरणातील धक्कादायक गौप्यस्फोट खुद्द देवस्थानचे पुजारी गणेश देशमुख यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे. देशमुखांच्या मते, ट्रस्टमध्ये केवळ पैशांचीच नव्हे, तर भाविकांची सुद्धा फसवणूक सुरू आहे. व्हीआयपी दर्शनासाठी चक्क बनावट पावत्या छापून भाविकांकडून रोखीने पैसे उकळले जात असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. हा 'बनावट पावती घोटाळा' नेमका किती मोठा आहे आणि यामागचे मुख्य सूत्रधार कोण, याबाबत आता संशयाची सुई फिरू लागली आहे.
पुजाऱ्यांनी केलेल्या आरोपांची यादी इथेच संपत नाही. देवस्थानच्या मालकीच्या महागड्या गाड्या, जसे की इनोव्हा आणि फॉर्च्युनर, या देवीच्या सेवेऐवजी वैयक्तिक आणि राजकीय दौऱ्यांसाठी वापरल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, भाविकांनी देवीला अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तू आणि मौल्यवान दागिन्यांमध्येही मोठी तफावत असल्याचे बोलले जात आहे. या तक्रारीनंतर पुणे धर्मदाय आयुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, देवस्थानच्या तिजोरीवर कोणी डल्ला मारला, याचा शोध आता प्रशासन घेणार आहे.
दुसरीकडे, या सर्व गंभीर आरोपांनी देवस्थानचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र, त्यांनी हे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत. "माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत मला कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सध्या निवडणुकांचे वातावरण असल्याने जाणीवपूर्वक बदनामी केली जात असावी. मी योग्य वेळी पुराव्यानिशी माझी बाजू माध्यमांसमोर मांडेन," असे स्पष्टीकरण देत त्यांनी आपली भूमिका बचावात्मक ठेवली आहे.
एकीकडे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या एकवीरा देवीच्या चरणी अर्पण होणारा पैसा आणि दागिने सुरक्षित आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे, तर दुसरीकडे ट्रस्टचे पदाधिकारी आणि पुजारी यांच्यातील हा सामना आता कायदेशीर लढाईकडे झुकला आहे. देवस्थानच्या कारभारात पारदर्शकता येईल की हा कोट्यवधींचा घोटाळा दबावाखाली दाबला जाईल? याकडे आता देवस्थान प्रशासकीय यंत्रणेसह तमाम भाविकांचे लक्ष लागले आहे.