राज्यात काही दिवसांपूर्वी मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. अजित पवार राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये दाखल झाले. यानंतर राजकीय हालचालींना पुन्हा नव्यानं वेग आला आहे. यातच राज्यातील सत्ता समीकरणांमुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, याचदरम्यान, आता भाजपच्या बड्या नेत्याने २०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री राहणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकीय घडामोडींसह मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवर भाष्य केलं. बावनकुळे म्हणाले, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्री बदलणार म्हणून विरोधी पक्षातील काही नेते संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र, २०२४ पर्यंत एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री राहणार आहेत. याबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाल्यानंतर आमच्यामध्ये कुठलीही अस्वस्थता नाही असंही बावनकुळे म्हणाले
.बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री बदलणार असल्याचे काही विरोधी पक्षातील नेते बोलत असले तरी देवेंद्र फडणवीस आणि आमच्या शीर्ष नेतृत्वाने व अजित पवार यांनी २०२४ पर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार असल्याचे स्पष्ट केले असून बदलण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, काही विरोधी पक्षाच्या नेत्यांचा महायुतीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा उद्योग सुरू असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही फूट पाडली नाही. आम्हाला कोणाचा पक्ष फोडण्यात काही रस नाही. आमच्या पक्षात कुठेही अस्वस्थता नाही. आम्ही विरोधी पक्षात होतो आणि विरोधी पक्षातून आम्ही सत्तेत आलो. फडणवीस एक पाऊल मागे आले आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले असे बावनकुळे म्हणाले.v