बीड: बीड जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. नुकतीच केज तालुक्यातील मस्साजोग गावात सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण होते. त्यानंतर आता पुन्हा एक धक्कादायक घटना घडली असून बीडच्या अर्धामसला गावातील मशिदीत पहाटे 3;30 च्या सुमारास प्रचंड स्फोट झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्फोटाची माहिती मिळताच विशेष पोलिस महानिरीक्षक संभाजी नगर परिक्षेत्र वीरेंद्र मिश्र व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्याचबरोबर, बॉम्ब शोधक पथक व फॉरेन्सिकचे पथकही घटनास्थळी दाखल झाले, आणि आता स्फोट घडवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार, एका माथेफिरूने हा स्फोट घडवल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, त्याचा हेतू काय होता आणि त्याच्याकडे स्फोटक पदार्थ कसे आले, याबाबत कोणतीही ठोस माहिती हाती आलेली नाही.
या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी मशिदीचे मोठे नुकसान झाले आहे. मशिदीतील काही भाग जमीनदोस्त झाला असून फरशी तुटून पडल्याची माहिती समोर आली आहे. रमजानच्या महिन्यात मशिदीत झालेल्या या स्फोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलीस तपासाची गती वाढवत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला आहे.
हेही वाचा: Gudi Padwa 2025: राज्यात गुढीपाडव्याचा उत्साह; मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत